Intense Marathi Articles

आठवणींच्या जाळ्यात

मधल्या जागेतून तेव्हाच्या स्वयंपाक घरात जाताना वाटेत आई म्हणजे माझी आजी आदाळयावर करली कापत बसलेली असतांना दिसते ….. ते माशाचं सळसळण … आणि वाटतं बरंच काही हरवलंय….. शनिवारची अर्धा दिवस शाळा… मम्मी घरी असल्याची गोडुली भावना… तिने काहीतरी स्पेशल च बनवलेलं असत… कधीचा तरी चविष्ट अंडा राइस आठवतो… आणि गोड शेवयांचा जर्मन चा डब्बा… असं वाटतं बरंच काही हरवलंय… चार वर्ष मोठ्या दादाने मेहनतीने खांद्यावर उचलून आणलेलं असतं मला शाळेतून…आणि एक रस्त्यावरची आगावू बाई म्हणते “एवढी मोठी झालीस… चालता येत नाही ?” मला आपलं उगाच वाटतं हिला माझं सुख बघवत नाहीय… शाळेत जायचं नसलं की अर्ध्या रस्त्यावर पोटात दुखायचं नाटक… की दादा परत घरी आणणार… आठवलं की वाटतं बरंच काही हरवलंय… सकाळी अंग गरम वाटलं तर शाळेला बुट्टी… मोकळ्या हवेतून डॉक्टर कडे जाईपर्यंत ताप उतरूनच जायचा… अशीच कधीतरी आजी आठवते… माझे चप्पल हातात घेऊन खांद्यावरून मला डॉक्टर कडे नेणारी… वाटतं बरंच काही हरवलंय…  एक दिवस ताई अंघोळीला… वह्यांना कव्हर कोण घालणार?… शाळेत तर निघायचंय… ताईने असाच भार अंगावर टाकलेला… नाहीतर मी मोठी कधी होणार? … आठवतो ताईने कपाळावर मारलेला हात… माझा गणिताचा पेपर बघून… कधीतरी मोठ्या वेताच्या खुर्चीत मला मांडीवर घेऊन बसलेली ताई… जीवनासाठी कला की कलेसाठी जीवन समजावणारी… मला स्पेशल परी भासवणारी ताई … लांब गेली … बरंच काही हरवलं… कुठे आठवतो तेव्हाचा जुना हॉल… घर अजूनही तेच… पण पकडा पकडी खेळणारे पप्पा कुठे आहेत?… ग्यालरी च्या कठड्यावर चांदण्यात बसवून गोष्टी सांगत भरवणारे… आणि अचानक कधीच ग्यालरीत चांदण्यात झोपण आठवतं… सगळे झोपलेत… मी एकटीच आकाशात चांदण्यांचं नवखपण न्याहाळणारी… खूप काही हरवलंय…रस्त्यावरच्या कुत्र्यांची भीती… धुरवाल्याला खालच्या  झोपड्यांमधून धुंडाळण… “वाडी टप्पी  पो! पो !..” म्हणून काही न कळणाऱ्या भाषेत काहीतरी विकणारा रोज येणारा फेरीवाला… गिरणीचा भोंगा…दिसणाऱ्या अर्ध्या रस्त्यांवरून तरंगत जाणार्या गाड्या… काकांनी आणलेला घेरेदार पाना पानांचा निळा फ्रॉक… सकाळी उठल्या उठल्या सात वाजता… “तुम्हे वतन पुकारता तुम हो वतन के  नवजवा… ” हे विरगीत… दुपारी “या डोळ्यांची दोन पाखरे … ” ऐकून उगीचच कसंतरी वाटणं… आणि संध्याकाळी “परीकथेतील राजकुमारा… ” ग्यालरीत उभं राहून मावळणाऱ्या सुर्य प्रकाशात बहुतेक घरीच जाणारे पक्षी… टीच्कीने मुंगळ्याला दूर उडवणं… मुंगीला अर्ध कापून तिचा लाल भाग फक्त चालत जाताना पाहणं… म्हशींच्या गोठ्यातून उगिचच adventure म्हणून येणं… लिफ्ट ने उगाचच वर खाली करण… दुधाचा पेप्सीकोला… गच्चीवर वाळत घातलेले पापड… आत्ते भावंडासोबत घातलेला उच्छाद… आईच्या आठवणीने राहायला आलेल्या दिनेशच्या डोळ्यातून आलेलं पाणी… खाऊ दे बिचारीला म्हणून निलेश ने जखमेवर तशीच बसू दिलेली माशी… ताई म्हणजे आत्ते घरी आली की होणारा स्वर्ग सुखाचा अनुभव……………… ताप आल्यावर जवळ घेणाऱ्या मम्मी ची मोरपंखी मिठी………………सगळंच तर हरवलं…. उरलंय फक्त एक मोठं माणूस… पैसे कमावणार!… बाकी सगळं हरवलेलं !!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *