आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे… हे गाणं ऐकलं तेव्हा वाटलं उगाचच हां… अतिशयोक्ती! पण प्रत्यक्ष लग्नाच्या आखाड्यात पाय ठेवले तेव्हा फोडणीत ढवळून निघणं म्हणजे काय याची प्रचिती आली.
पहिला मुलगा बघायला आला तेव्हा मी नेहमीसारखी हसत बाहेर आले आणि सगळ्यांकडे बघत बसले. मुलाकडच्यांनी प्रश्न विचारले तेव्हा मीही काही प्रश्न विचारले. हिला आधीच ट्रेनिंग द्यायला पाहिजे होत अशा अविर्भावात सगळे माझ्याकडे बघत राहिले. आणि मी अजाण बालक! पाहुणे निघून गेले आणि मुलाकडच्यांसमोर आलीस कि इंटरव्ह्यू द्यायला म्हणत सगळ्यांनी माझी खरडपट्टी काढली. मुलगी थोडी फॉरवर्ड आहे असं म्हणत मुलाकडच्यांचा नकार आला.
दुसरा मुलगा आला आणि मी लाजण्याचा अभिनय करत बाहेर येऊन बसले. मुलगा माझ्या थोड्याशा सुटलेल्या पोटाव्यतिरिक्त काही पाहिच ना.. घरी खूप प्रॉब्लेम्स आहेत.. वडिलांच्या डोक्यावर परिणाम झालाय असा नकारात्मक सूर लावला त्याने तेव्हाच कळलं याचा नकार येणार. नकार आला आणि स्वतः किती बारीक आणि दाट केसांचे आहोत हे त्याने पाहाव असा जळफळाट मनात करत ते प्रकरण संपवलं.
तिसरा मुलगा बघायला मी विवाह मंडळात गेले होते. तो मुलगा पाहताना “झोंबी” हि कल्पना नसून वास्तवातही तशी अर्धमेली माणसं असतात असं वाटून राहील. अर्थातच मी त्याला नकार दिला.
चौथा मुलगा बघायला गेले. डोक्यावर टक्कल! पण मुलगा माझ्याशी चांगलं बोलला म्हणून मी होकार द्यायचं ठरवलं. पण त्याच्या आईचे अविर्भाव पुष्कळ नकारात्मक वाटले. मुलगी बुटकी व सावळी आहे म्हणून तीथुन नकार आला. निदान आपल्या मुलाच्या कले कलेने वाढणाऱ्या टकलाकडे तरी तिने पाहावं!
पत्रिका हे प्रकरण मला फार भोवलं. जिच्यात काही दोष नसूनही फार थोड्या पत्रिकांशी जुळते अशी दुर्मिळ पत्रिका माझ्या नशिबात. कुणासोबतच जुळेना. शेवटी मॅट्रिमोनिअल साईट्स वर ओपन माईंडेड मुलं असतील असं वाटून तिथे नाव टाकलं. एका मुलाला मी भेटायला गेले. सुरवात चांगली झाली. मग हळूच मी मुद्द्याला हात घातला.. पत्रिका बघणार का असं विचारलं. तर तो हो म्हणाला. पत्रिका प्रकरणामुळे भिजलेल्या पोह्यांसारखी लाही लाही झालेली माझी मनस्थिती बिघडली. देवावर विश्वास आहे तर देव सगळं नीट करेल पत्रिका का बघायची.. असं म्हणत जे लेक्चर झाडलं मी त्या मुलाला… गर्भगळीत होऊन “आय डोन्ट हॅव कम्फर्ट लेव्हल वूइथं यु” असं प्रामाणिक उत्तर त्याने पाठवल.
अशा अनेक फोडण्या येत गेल्या… मी सुंदर नाही हे मला माहीत आहे. पण मी जाडी बुटकी काळी कमी पगारवाली कमी क्वालिफाईड थोडक्यात बिनकामाचं लोढणं आहे असा साक्षात्कार मात्र पोहे चुलीवर चढल्यावर आला.. आणि अजूनही फोडण्यांचा कार्यक्रम चालूच आहे.