नायक नायिकेला म्हणाला “तू मला वस्तूसारखं वापरलंस!” आणि मी विचार करत राहिले.. वस्तूसारखं??? मी तर वस्तू किती जपून आणि हळुवार वापरते. एकदा मी ग्रुप वर म्हटलं “मी वस्तुंना जवळचं मानते” आणि हा कल्ला… माणसं मिळत नाही म्हणून वस्तू?? हो! माणसं काय असतील नसतील. पण वस्तू इमाने इतबारे आपल्या सेवेसाठी हजर. तुटे फाटे पर्यंत. आणि अशा कितीतरी वस्तू डोळ्यांसमोरून जाऊ लागल्या…
काकांनी दिवाळीला दिलेला निळ्या पानापानांची नक्षी असलेला फ्रॉक… गोल फिरलं कि घेर धरून नाचायचा माझ्या सोबत.. तंबोरा तबल्याचं निळं लाल चित्र असलेला वीतभर ट्रे… टी व्ही वर ठेवलेला लाकडाचा हत्ती.. मम्मीने बनवलेले मण्या मण्यांचा जिराफ आणि कुत्रा… ज्यांना मिठीत घेऊन बसायचे.. सशासारखे केस असलेली सफेद पर्स… जोरात धावणारी पिवळी रेस ची गाडी.. कशावरूनही चढणारी चंदेरी करड्या रंगाची गाडी.. आणि कितीतरी…..
अजूनही अनेक वस्तू माझ्या मनात स्थान निर्माण करून आहेत… पारंपारिक नक्षी असलेली जीन्स ची खांदा बॅग.. रंगबिरंगी भरलेली मोठी पर्स… माझा खड्यांचा पिवळा ड्रेस… अथक परिश्रम करून साथ देणारा माझा पी सी… माझ्या आयुष्याचा जोडीदार माझा मोबाईल… आणि बरंच काही…
कुणी विचारलं त्रासात काय तुला वस्तू साथ देणार? माणसंच लागणार ना? माणसांचं महत्व मी कमी लेखत नाही.. पण कुणी माणूस असेलच का त्रासात, कुठे शाश्वती आहे? हा आपला माझा अनुभव! वस्तू तर नियमित जवळकीच्या भावनेने माझ्या मनाचे बंध जुळवून आहेत. त्यांच्या सोबतीने माझं मन सुखावत आहे… हेही नसे थोडके…
तरी मी थोडीशी अस्वस्थ झालेच.. माझ्या एका मैत्रिणीला म्हटलं.. मला वस्तू जवळच्या वाटतात प्रॉब्लेम आहे ना?? ती म्हणाली तू वस्तूंशी आपुलकी ठेवून स्वार्थी नाही बनत.. तेही एक प्रेम आहे… निखळ प्रेम… आणि मी नॉर्मल आहे म्हणून सुस्कारा सोडत माझा जीव भांड्यात पडला.