Satirical Marathi Articles

काही समानअर्थी शब्द

समानअर्थी शब्द शीर्षक वाचून “दारू” “मदिरा”, “अग्नी” “आग”, “माणूस” “मानव” असे अनेक शब्द तुमच्या मनात आले असतील. पण मी या सामानअर्थी शब्दांबद्दल नाहीच बोलत आहे मुळी. मी त्या शब्दांबद्दल बोलतेय जे स्थलकालपरत्वे समान रूप धारण करतात. “बिचारा किती ‘साधा भोळा’ आहे रे” असं आपण बोलतो. पण त्याच माणसाने आपल्या कामात गल्लत केली कि “‘बावळट’ लेकाचा जराही हुशारी नाही!” असं बिनधास्त बोलतो आपण. एखादी मुलगी “फार ‘पुढारलेली’ आहे… ” पण पुढारीपणा आपल्यापुढे केला कि “एक नंबर ची ‘आगाऊ'” होते. एखादा माणूस “अतिशय ‘व्यवहारी’ हा, हुशार” पण आपल्या जीवाशी येणारा निर्णय घेतला कि “‘ निगरगट्ट’ भावनांचा त्याचा काही संबंध नाही” एखादा “एकदम ‘तल्लख'”आणि आपली चोरी पकडली कि “‘चालाख’ कुठला” एखादी मुलगी “एकदम ‘मितभाषी’ उगाच अघळ पघळ बोलणार नाही.” पण तिने करू नये ते केलं कि “वाटतच होत ‘आतल्या गाठीची’ खाली मुंडी अन पाताळ धुंडी” एखादा माणूस “एकदम ‘निर्भीड’ घाबरत नाही, तोंडावर बोलतो” तोच आपल्याला स्पष्ट बोलला कि “‘फटकळ’ कुठला… तोंडावर वाट्टेल ते बोलतो”  असे अनेक समानअर्थी शब्द आहेत व्यवहारात. तुम्हाला कुठले कुठले आठवतात?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *