Satirical Marathi Articles

फेसबुकीया, व्हॉट्सऍपिया – अर्थात सोशल मीडियाया

कुणाला मलेरिया होतो कुणाला चिकनबुनिया. पण जवळ जवळ प्रत्येकाला झालाय तो आजार म्हणजे फेसबुकीया, व्हॉट्सऍपिया, अर्थात सोशल मीडियाया. याची सुरुवात होते “भला उसके लाईक मेरे लाईक से जादा कैस?” या भावनेने. काही महाभाग तर भेटलेल्या प्रत्येकाला फेसबुक मध्ये ऍड करत जातात. भलेही ती “फ्रेंड्स लिस्ट” असो आणि भेटलेल्या माणसाचा फ्रेंड या शब्दाशी काही संबंध नसो.

माझा एक मित्र हनिमूनला गेला होता. प्रत्येक ठिकाणी काढलेला फोटो तिथून तो फेसबुक वर अपलोड करत होता. हे सत्र कुठपर्यंत चालेल याची धास्तीच घेतली होती माझ्या मनाने…

काही फेसबुकीया प्रत्येकाच्या प्रत्येक फोटोला लाईक करत सुटतात. जर आपण लाईक केले नाही तर आपल्याला लाईक कसे मिळणार?

सतत डीपी चेंज करत राहणं हे तीव्र फेसबुकीया आणि व्हॉट्सऍपियाचं लक्षण. काही लोक दिवसाला एक याप्रमाणे डीपी बदलतात. मग तो अगदी घरी काढलेला सेल्फी का असेना. सेल्फी आणि सेल्फी मृत्यू हा सोशल मीडियाया चा साईड इफेक्ट!

माझी एक मैत्रीण फेसबुकवर एका व्यक्तीचे सोडून सगळे फोटो लाईक करत होती. मी तिला विचारलं असा अत्याचार का? ती म्हणाली “ती माझे कुठलेच फोटो कधीच लाईक करत नाही.” मी चाटच पडले. बदलेकी आग…

व्हॉटसऍप स्टेटस पद्धत आल्यापासून लोक तर मोबाइललाच चिकटलेले असतात कि काय असा प्रश्न पडतो. सुविचार शायरी अलाना फलाना.. खचच खच!

ट्विटर च्या ट्विट ट्विटाने तर डोकी पिंजून काढलीत. कोणीही कोणाही बद्दल ट्विट ट्विटतं आणि सुरु होतं वादाचं ट्विट ट्विटण…

माझी एक मैत्रीण घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे फोटो फेसबुक वर टाकत राहते. तिला फेसबुकीया राणी म्हणून फेसबुक ने किताब दिला पाहिजे.

काही घरची मंडळी तर फेसबुक वरच वार्तालाप करतात

नवरा फेसबुकवर “हॅप्पी अनिव्हर्सरी…आय लव्ह यु डिअर”

बायको फेसबुकवर “थँक्स डिअर.. आय लव्ह यु टू”

नवरा फेसबुकवर “तुझी साथ असेल तर मी जग जिंकेन”

बायको फेसबुक वर – लाजणारा इमोटिकन

बाजू बाजूला बसूनच असे मेसेज टाकतात का कोण जाणे…

हो नाही म्हणत मी सुध्दा फेसबुकवर प्रोफाइल बनवलं आणि व्हाटसऍप डाउनलोड केलं. मला काही व्हॉट्सऍपिया झालेला नाही, पण फिरायला गेले कि व्हाट्सअँप स्टेटस अपडेट करत राहते.. आपली मजा शेअर केली पाहिजे ना, एव्हढच फक्त. छान फोटो आल्यावर लोकांनी तो पाहावा हि सुप्त इच्छा फक्त म्हणून डीपी बदलते.. नाहीतरी स्मार्ट फोन वर स्मार्ट फोटो काढून तो काय पूजेला लावायचाय? विचारांची देवाण घेवाण हीच इच्छा फक्त म्हणून ट्विटर आणि फेसबुक वर विचार मांडते.. मला काही फेसबुकीया झालेला नाही हा… घटना घडल्या तर त्या लोकांना कळाव्यात याच हेतूने फक्त फोटोज अपलोड करते. जे आपले फोटो लाईक करत नाही त्यांच्याशी काय आपलं देणं घेणं म्हणून फक्त त्यांचे फोटो लाईक करत नाही… फेसबुक वर मित्र मैत्रिणी वाढवणं हे सोशल माणसाचं लक्षण नाही का? म्हणून प्रत्येकाला फेसबुक वर ऍड करते.. आणि फोटो अपलोड केल्यावर उत्सुकता फक्त हो.. म्हणून नोटिफिकेशन बघत राहते.. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना फेसबुक व्हाटसऍप बघते … याचा अर्थ मला सोशल मीडियाया झालेला आहे असं मात्र समजू नका हा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *