काही क्षण वेगळेच असतात! अस्तित्वाशी घट्ट जोडलेले, भूतकाळ भविष्यकाळ यांच्याशी धागे तोडणारे. जसा गावचा मुसळधार पाऊस… ढग गडगडतात… विजा लखलखतात… आणि मनात काहूर! असंख्य स्वप्नांची रेलचेल… त्यात वीज जाऊन घरात पूर्ण अंधार झाला की आकाशातल्या विजेच्या अनिर्बंध प्रकाशावर आपला जीव अधांतरी! काजव्यांचा उत्स्फूर्त नाच… हवेत मस्त गारवा… पहिला पाऊस आणि मातीचा सुगंध या जोडगोळीने तर सर्वांच्याच मनात स्थान मिळवलंय.
आवडीचं पुस्तक! त्यात नुकतीच परीक्षा संपलेली असली तर आनंद द्विगुणित! आपलं पूर्ण अस्तित्व विसरून कथेशी आणि कथेतील व्यक्तींशी समरस व्हायचं. सगळं बाजूला सारून अधाशासारखं पुस्तक संपवायचं.
हातात हापूस आंबा आणि टी. व्ही. वर आवडता कार्यक्रम. हापूस आंब्याच्या स्वर्गीय चवीबरोबर आवडता कार्यक्रम पाहताना सगळ्या व्यथा जबाबदाऱ्यांची जाणीव नष्ट होऊन जायची!
चाफ्या मोगऱ्याचा सुगंध… अद्भुत! ट्रेन मध्ये धक्का बुक्कीचा प्रवास करून उतरल्यावर वाटेत चाफा किंवा मोगऱ्याचा गजरा विकणाऱ्या बाईच्या टोपलीतून येणारा सुगंध क्षणासाठी का होईना मन प्रसन्न करून जातो.
बाल्कनीत ताऱ्यांच्या साक्षीने झोपणं… आकाशाचं आणि ताऱ्यांचं गूढ अस्तित्व न्याहाळताना आपलं अस्तित्व किती यःकश्चीत आहे असा अर्थबोध होतो.
एक दिवसाच्या चिमुरड्या जीवाला पहिल्यांदा हातात घेताना, या छोट्याशा अस्तित्वात जीव कुठे आहे… चेतना कुठे दडलीय, या चमत्काराचा विचार येऊन जादुई भावना जागृत होते.
फॅमिली किंवा फ्रेंड्स गेट टुगेदर! आपल्या जवळच्या काका मामा मावशी भाऊ बहिणी या सर्वांनी किंवा मित्र मैत्रिणी एकत्र येणं… आणि नुसता धुमाकूळ! विनोदाची रेलचेल.. कुणी कुणाचं नसतं. माणूस शेवटी स्वार्थी असतो. अशा व्यावहारिक सत्याच्या पलीकडे जाऊन एकत्र येणं आणि धमाल उडवून देणं… सगळा शीण कुठच्या कुठे निघून जातो.
बक्षीस मिळणं! आपल्या परिश्रमांना जणू काही परमेश्वराने दिलेल्या नशिबाने सोबत करणं…
‘आय ऍम चोजन वन’ अशी विशेष भावना मनातील आनंदाचं भांडार उघडते.
सहल मग ती कुटुंबाबरोबर असो किंवा मित्रमंडळीसोबत. ते एक छोटं आयुष्यच असतं. लहान मुलांसारखं होऊन बागडत राहायचं…
प्रेमाच्या स्त्री किंवा पुरुषाचा पहिला स्पर्श… परकेपणा हरवून जाणं… अंगा अंगावर रोमांच उभे राहणं… आणि बरंच काही
आपण आपल्या रुक्ष नित्यक्रमात गढून गेलं असताना अचानक आलेली वाऱ्याची झुळूक… त्यात कडक उन्हाळा भंडावून सोडत असेल तर ती झुळूक अलगत मनात लपवून ठेवावीशी वाटते..
कल्पना सुचण्याचा युरेका युरेका क्षण! एकदम भन्नाट!
समुद्रात येथेच्छ डुंबून सगळी मस्ती झाल्यावर काठावर शांत बसून गाजेसोबत शून्यात हरवून जाणं… रात्रभर ती गाज ऐकू येत असेल तर झोप येऊच नये कधी अशी अव्यवहार्य भावना… कुण्या निराश माणसाला प्रश्न पडतो “कशासाठी जगायचं?” या व अशाच मौल्यवान क्षणांचं गाठोडं बांधून ते उशाशी घेऊन झोपून जायचं… आयुष्य आयुष्य म्हणतात ते काय आहे शेवटी…