काही जणांना नवरा मिळतो पण काही जणांना साथीदार भेटतो. हा नवरा आणि साथीदार मधला तोल सांभाळणं खुपसं आपल्यावरही असतं. आणि साथीदार किती कालावधी पर्यंत टिकेल आणि त्याचं नवऱ्यामध्ये रूपांतर होईल तेही आपल्यावरच. आता हे आपण म्हणजे नवरा बायको दोघंही. स्वतःमधल्या काही गोष्टी बायको कधीच बदलू शकत नाही हे नवऱ्याने स्वीकारलं आणि काही स्वतःमधल्या गोष्टी आपला नवरा कधीच बदलू शकत नाही हे बायकोने स्वीकारलं की झालं. त्या कठीण समयी तोल सांभाळता आला की घटस्फोट होणार नाही हे तरी नक्की झालं. मग येते पुढची पायरी…प्रेमाची…सुदैवाने चांगले गुण देवाने सगळ्यांनाच दिलेत. नवऱ्यातल्या सगळ्यात नावडत्या गोष्टीसमोर हे चांगले गुण छातीठोकपणे उभे राहिले पाहिजेत…तेव्हा जुळतं प्रेम… नेहमीच काही हातात हात घालून फिरणं हेच प्रेम नसतं… कधीतरी अचानक आईसमोर बायकोची बाजू घेऊन उभं राहिलं आणि कधीतरी अचानक स्वतःचे बाबा नवऱ्याला काही शिकवण देत असताना त्याची बाजू ठामपणे घेणं कधी न विसरायला होणारे प्रेमाचे अनुभव होऊन जातात. नित्यक्रम ही जगातली सगळ्यात कंटाळा आणणारी गोष्ट आहे. नेहमी तोच चेहरा, तीच कामं आणि त्याच समस्या…यात प्रेम आलं कुठे? तर नवऱ्याने अचानक बायकोसाठी मित्र मंडळींसमोर गायलेल्या गाण्यात आणि बायकोने कोपरा शोधून अचानक नवऱ्याला दिलेल्या चुंबनात…..