मुग्धा धावत घरात शिरली आणि तिने बॅग सोफ्यावर टाकून दिली.
मुग्धा: “आई भूक लागली.”
आई: “मुग्धा काय हे!!! बॅग नीट ठेव आधी मगच जेवण.”
मुग्धा: “आई एव्हढं काय अडतं…”
आई: “शिस्त असली पाहिजे बाळा. घर व्यवस्थित दिसलं पाहिजे ना. दुसऱ्यांसाठी नाही. आपल्या मनाला बरं वाटतं.”
मुग्धा ने कंटाळत बॅग जागेवर ठेवली.
मुग्धा: “ठेवली आता दे जेवण.”
आई: “अगं कपडे बदल, हात पाय धु.”
मुग्धा: “ते करते ग मी…”
मुग्धा हात पाय धुवायला गेली. इकडे मुग्धाने ठेवलेली बॅग टेबलवरून खाली कोसळली. आणि बॅगेची चेन पण लावली नव्हती म्हणून काही पुस्तकं बाहेर पडली. आईने डोक्यावर हात मारला आणि ती बॅग उचलायला गेली. बॅग उलटी पडली होती त्यामुळे आईने पटकन बॅग उचलताच सगळं सामान बाहेर पडलं.
आई: “काय हे.” असं म्हणत आईने बॅग नीट आवरायला घेतली. मुग्धाला सगळ्याचे क्लास लावले होते त्यामुळे आईला फार अभ्यासात लक्ष घालावं लागत नसे. मुग्धा होती पण चुणचुणीत आणि अभ्यासात हुशार त्यामुळे काहीच टेन्शन नव्हतं. आईने म्हटलं बघूया हिच्या वह्या. आणि ती एक एक वही चाळायला लागली. तिने काही वह्या बघितल्या. मुग्धाचं हस्ताक्षर बघून ती खुश झाली. बऱ्याच उत्तरांना पैकी च्या पैकी मार्क्स होते. आई समाधानाने एक एक वही बघत होती. तिने हिस्टरी च बुक ठेऊन द्यायला उचललं आणि अचानक त्या पुस्तकातून पैसे जमिनीवर पडले. आईने आश्चर्याने पैसे उचलले. पूर्ण २१० रुपये होते ते. आईला आश्चर्य वाटलं. आपण तर मुग्धाला पैसे देतच नाही. मग तिच्याकडे एव्हढे पैसे कुठून आले. आईला काही कळेना पण मग तिच्या डोक्यात चक्र फिरायला लागली. काय केलं असेल मुग्धाने तिला काहीच कळेना. तिला वाटलं विचारावं मुग्धाला पण आपलं विचारताना काही चुकलं तर. काही नको ते बोललो आणि मुग्धा चिडून ऐकेनाशी झाली तर. बाबा शांत स्वभावाचे होते. त्यांनाच विचारू दे असा तिने विचार केला. पण तिचं टेन्शन काही कमी होईना….
रात्री शांत वेळ पाहून आई बाबांना म्हणाली.
आई: “मला एक सांगायचं होतं.”
बाबा: “अगं बोल ना परमिशन घेणार आहेस का लग्नाच्या इतक्या वर्षांनंतर.” आणि बाबा हसले.
आई: “मस्करी नको, गंभीर बाब आहे.”
बाबा: “बरं बाबा मी गंभीर चेहरा करतो…बोल आता.”
आई: “आज मी मुग्धाचं दप्तर बघत होते तर एका पुस्तकात २१० रुपये सापडले.”
आता बाबांचा पण चेहरा बदलला.
बाबा: “तू विचारलंस का तिला.”
आई: “नाही. माझा रागाचा पारा चढेल आणि ती चिडले. म्हटलं तूच विचारलं तर बरं होईल.”
बाबांनी लगेच मुग्धाला हाक मारली.
बाबा: “मुग्धा…ए मुग्धा”
मुग्धा तिच्या खोलीतून आली.
मुग्धा: “काय बाबा?”
आणि मुग्धाने येऊन बाबाला मिठी मारली.
बाबा: “ऐक मी काय विचारतोय ते. आणि खरं खरं उत्तर दे. एकाच चान्स आहे हा तुला म्हणून खरंच उत्तर द्यायचं.”
मुग्धा: “हो बाबा. विचारा ना.”
बाबा: “तुझ्याकडे २१० रुपये कुठून आले?”
मुग्धा थोडीशी घाबरून आईकडे बघू लागली. मग तिने खाली मान घातली.
मुग्धा: “मी कमावले ते.”
आई वैतागली
आई: “कमावले??? कसे???”
मुग्धा: “बाबा मी क्लास हेड आहे ना. मग बोलणाऱ्या ज्या लोकांची मी नावं बोर्ड वर लिहिते किंवा जे चुका करतात त्यांच्याकडून कंप्लेन्ट न करायसाठी १० रुपीज पर पर्सन घेते. करण कम्प्लेन्ट झाली की पॉईंट्स कमी होतात.”
आई: “काय!!!! अगं कुठे शिकलीस हे सगळं. भ्रष्टाचार आहे हा.”
बाबा: “अरे तू लगेच एव्हढं मोठं नाव देऊ नकोस, मी बोलतोय ना तिच्याशी.”
आई: “अरे काय मोठं.. मोठी होऊन, मोठ्या पदावर जाऊन असेच पैसे घेईल लोकांकडून खोटं बोलायचे आणि कामं करायचे.”
मुग्धा: “व्हाट्स रॉन्ग इन दॅट.”
आई: “बघा वर तोंड करून विचारतेय आणि…”
बाबा: “मुग्धा आपण या विषयावर नंतर बोलू. संपला नाही हा हा विषय. जा तू आता झोप.”
आई आश्चर्याने बाबांकडे बघत राहिली.
बाबा : “अगं ती एव्हढी पण लहान नाही राहिली की न प्रश्न विचारता आपलं ऐकेल. आणि आपण जबरदस्ती करू तिच्यावर आणि आत्ता ती ऐकेल. पण लॉंग टर्म मध्ये तेच करेल जे तिला करायचंय. आपल्याला तिला पटवून दिलं पाहिजे.”
आई: “शाळेतच असलं पाहिजे व्हॅल्यू एज्युकेशन… काय करायचं आता.”
बाबा: “उद्या रविवार आहे मी तिच्याशी बोलतो.”
दुसऱ्या दिवशी निवांत वेळ मिळाल्यावर बाबांनी मुग्धा ला बोलावलं.
बाबा: “हे बघ मुग्धा दोन गोष्टी आहेत. एक तर तू चुकीच्या वागण्याला प्रोत्साहन देते आहेस. अशाने सगळे विद्यार्थी बिनबोभाट चुकीचं वागायला लागतील. आणि सगळा गोंधळ होईल. आणि दुसरं तू स्वतःची मूल्य जपली पाहिजेस. पैसे घेऊन चुका माफ करणं हा एक प्रकारचा भ्रष्टाचार
आहे, माहीत आहे का तुला.”
मुग्धा: “व्हाय शुड आय केअर! मला एव्हढे पैसे मिळताहेत त्यातून मी मला हवं ते काही पण करू शकेन.”
बाबा: “हे बघ मुग्धा पैसेच सगळं काही नसतं. जी मुलं तुला पैसे देतात ती तुझ्याबद्दल काय विचार करतील… तुझ्या कॅरॅक्टर बद्दल काय विचार करतील. आणि काही लोक तू पैसे घेतल्याबद्दल तुझ्यासाठी वाईट चिंतत असतील. त्यांचे शाप बाधणार नाहीत का तुला.”
मुग्धा: “बाबा काय बोलतोयस तू…असं काही असतं का. काही पण काय.”
बाबा: “हे बघ मुग्धा तुला कसं पटवून देऊ मला काही कळत नाहीय. पण आपण प्रामाणिकपणे जगणारी माणसं आहोत. सगळेच तुझ्यासारखे वागायला लागेल तर सगळा भ्रष्टाचार होईल, सगळी अराजकता माजेल. कुणीच कुणाची काळजी करणार नाही. माणुसकी संपेल. सगळे स्वार्थाने वागायला लागले तर जग संपून जाईल.”
मुग्धा फक्त बाबांकडे बघत राहिली.
बाबा: “हे बघ तू नीट यावर विचार कर.”
मुग्धा: “ओ के बाबा.”
मुग्धा वर्गात बसली होती. तिला कळत नव्हतं एव्हढं काय मोठं झालय. उलट ती या वयात पैसे कमवायला लागली होती. विचार करता करता तिला पटकन आठवलं, कालच्या गदारोळात बायोलॉजीचे बुक आणायची राहिली. तिने पटकन तोंडावर हात ठेवून ओह असं म्हटलं. मागच्या अर्णव ने ते पाहिलं.
अर्णव: “काय ग मुग्धा?”
मुग्धा: “अरे मी बायोलॉजीची बुक विसरले.”
अर्णव: “ओह मग तुझे पॉईंट्स कट होणार आता.”
मुग्धा: “टीचरला कळलं तर पॉईंट्स कट होतील ना”
ही गोष्ट बाजूच्या मेघाने ऐकली.
मेघा: “पॉईंट्स तर कट होणारच कारण मी टीचर ला सांगणार.”
मुग्धा: “नको ना ग असं करू.”
मेघा ने नजर बेरकी केली
मेघा: “मग तू घेतेस तसे मला २० रुपीज दे.”
आणि मेघाने हात पुढे केला. मुग्धा तर बघतच राहिली
अर्णव: “आणि मी पण सांगणार…मला पण २० रुपीज दे.”
मुग्धा: “काय!!!!”
दोघे हात पुढे करून मुग्धाकडे जिंकल्याच्या आवेशात बघत राहिले. मुग्धाला मेल्याहून मेल्यासारखं झालं.
मुग्धा: “पण मी तर १० रुपीजच घेते.”
मेघा: “अजून १० रुपीज अजून लोकांना न सांगण्याचे. नाहीतर ते पण १० रुपीज मागणार.”
मुग्धाला एकाच वेळी खूप राग आला आणि डोळ्यातून पाणी पण आलं. तिने तावातावाने दोघांना २० २० रुपये काढून दिले. आणि तिला खूप काहीतरी कळून चुकलं. बाबा काय सांगत होते ते सगळं तिला कळलं नव्हतं. पण एव्हढं मात्र कळून चुकलं की असं वागलेलं बरोबर नाही. निदान आपल्याबरोबर कोणी जसं वागलेलं आवडत नाही तसं तरी दुसऱ्यांबरोबर वागू नये….
आज स्वयंपाक बाबा करणार होते. आईला मुग्धाच्या टेन्शनने थोडं बरं वाटत नव्हतं. बाबा स्वयंपाक घरात होते आणि आई बेडरूममध्ये पडली होती. मुग्धा आईकडे गेली. आई पाठमोरी होती. मुग्धा बेडवर चढली आणि तिने आईला मिठी मारली. आणि तिला रडूच फुटलं.
मुग्धा: “आई सॉरी…मी कुणाकडून पैसे नाही घेणार”
आई : “अगं रडते का… छान झालं तुला कळलं ते. रडू नको आता.”
मुग्धा: “आई अर्णव आणि मेघाने मी बायोलॉजीची बुक विसरल्याबद्दल ४० रुपीज घेतले माझ्याकडून. मला कळलं असं करणं किती वाईट आहे ते. कोणालाच आवडणार नाही. मी कधी असं नाही करणार.”
आईला खूप आनंद झाला. तिने मुग्धाला मिठी मारली. आणि तिचं तोंड पुसत ती हसत हसत उठली.
आई: “ए बाबा मी जेवण बनवते रे…थांब तू…”