शीतलचा पगार झाला. खुशीमध्ये ती मैत्रिणींबरोबर रेस्टॉरंट मध्ये गेली. कुणीशी दारू मागवली. तिनेही मंद चढेपर्यंत घेतली. निघाले तेव्हा सगळेच धुंदीत होते. कारमधून जाताना तिला चकाचक कपड्यांचं दुकान दिसलं. काचेतून एक सुंदर ड्रेस तिला बोलावत होता. तिने लगेच कार थांबवली आणि तो ड्रेस विकत घेऊन टाकला. घरी पोचेपर्यंत धुंदी उतरली होती. ती घरात आली. तिने नवीन विकत घेतलेला ड्रेस ठेवायला कपाट उघडलं आणि तिला जाणवलं त्यात जागाच नाहीय. एक उदासीनता रोज रात्रीप्रमाणे तिच्या मनात शिरली. नोकरीने खूप काही दिल होत. कमालीचं स्वातंत्र्य…पण…तिला काहीसं वाटलं आज घेतलेल्या ड्रेसचा रंग तिला पप्पांनी दहाव्या वाढदिवशी घेतलेल्या ड्रेसच्या रंगांशी मिळता जुळता होता. कपाट खच्चून भरलेलं होतं तरी ती ढसा ढसा रडू लागली…