शिवकृपा सोसायटी, पहिला मजला, रुम नंबर २. इथे राहत होते सोम्या उर्फ सोमनाथ दिघे. वय वर्ष ६० असलं तरी तरतरीत, निरोगी आणि हसतमुख. त्यांचे सगळे मित्र त्यांना प्रेमाने सोम्या म्हणत. आपण पण सोम्याच म्हणू. सकाळी नियमित योगा, वृत्तपत्र वाचन, वेळेवर नाश्ता, जेवण. सगळ्या बाबींमध्ये व्यवस्थित सुसूत्रता. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे त्यांचे खूप मित्र होते. मितभाषी असले तरी ज्यांची त्यांच्याशी ओळख होई ते त्यांना कधी विसरत नसत. खूप जणांना पुढे होऊन पैशाची मदत केली होती त्यांनी. त्यात त्यांची गोड बोलण्याची सवय अतिशय लाघवी होती.
संध्याकाळी सोम्या आपल्या मित्रांना भेटायला गार्डन मध्ये आले. सगळी मंडळी जमली होती. गप्पागोष्टी सुरू होत्या. रघुवीर वीरकर आजोबांची सून त्यांना नेहमी बोलत राही. तोच विषय चालला होता. सगळ्यांचं म्हणणं होतं कामाशिवाय त्यांनी तिच्याशी बोलूच नये. पण सौम्य स्वभावाच्या सोम्यांच असं म्हणणं नव्हतं.
सोम्या: “अरे वाद कोणत्या घरात होत नाहीत. ती बोलली तरी तू गप्प बसंत जा. आणि उगाच अबोला धरू नकोस. हळू हळू बदलेल ती. तिचीही काही कारणं असतील ना चीड चीड करायला.”
कामत आजोबा: “हो हो… आला मोठा सुनेची बाजू घेणारा.. तुला अशी सून मिळाली असती तर कळलं असतं. यांच्यासाठी आयुष्यभर सगळं करून पण यांची तोंडं वाकडीच. गोम्या असायला पाहिजे होता. मग बरोबर बोलला असता.”
बापट आजोबा: “अरे आज गोम्या कुठे गेला?”
तितक्यात गोम्या उर्फ गोमुख शिंदे यांची एन्ट्री झाली. वाघासारखी चाल, मजबूत बांधा. आणि बोलणं पण असं की वाघाची गर्जना व्हावी. अतिशय बोलक्या स्वभावामुळे गोम्यांचेही खूप मित्र होते. पण त्यांचा स्वभाव एव्हढा रागीट की काही खपवून घेत नसत. जशास तसे ही त्यांची पॉलिसी होती.
सुगंधे आजोबा: “शंभर वर्ष आयुष्य!”
गोम्या: “अरे जगणारच मी शंभर वर्ष.. काय चर्चा चालली होती तुमची?”
वीरकर आजोबा: “तेच ते रे रोजचं माझ्या सुनेचं.. काल म्हणते तुम्ही काय कमवून ठेवलं आमच्यासाठी..”
गोम्या: “अरे तुझं घर आहे ना! हाकलून टाक त्या दोघांना. एकटा राहू शकतोस तू. तुझी पेन्शन आहे ना…. बस! पैसा असला की कुणाची गरज नसते.”
सोम्या: “अरे असं कसं म्हणतोस. कुटुंबाची गरज असते आपल्याला. खास करून या वयात.”
गोम्या: “हा मोही कसा एकटा राहतो म. काय मोही राहतोस की नाय मजेत!”
मोहन तांबे आजोबांनी समाधानपूर्वक मुद्रा केली.
गोम्या: “मग!!”
सोम्या: “अरे त्याचा स्वभाव आणि रघुचा स्वभाव सारखा आहे का?”
गोम्या काही बोलणार तितक्यात सुगंधे आजोबा मध्ये पडले.
सुगंधे आजोबा: “अरे तुमचे रोजचे वाद नकोत सोम्या गोम्या. गप्प राहा बघू.”
इकडे सोम्या घरी आले आणि विचारात पडले. वास्तविक सोम्यांची सून सुद्धा सोम्यांना घालून पाडून बोलायची. तिला वेगळं राहायचं होतं. सोम्यांच ओझं झालं होतं तिला. मुलगा सुद्धा तिची बाजू घ्यायचा. वास्तविक त्याला वडिलांना एकटं टाकायचं नव्हतं. पण बायकोच्या चिडचिडीमुळे तो त्यांना असं वागू नका, तसं करू नका म्हणून सांगत राहायचा. पण सोम्यांनी हे कुणालाच सांगितलं नव्हतं. कधीतरी आपल्या वागणुकीने आपण सुनेला बदलू असंच त्यांना वाटत राहायचं. पण आज ते विचारात पडले होते. ‘गोम्या म्हणतो ते खरं आहे का?’
दुसऱ्या सकाळी गोम्या आपल्या स्नॅक्स कॉर्नर वर गेले. त्यांनी रिटायरमेंट नंतर काढलं होतं स्नॅक्स कॉर्नर. पीक टाइम नव्हता तरी कुणी ना कुणी खायला येत असे. गोम्या गल्ल्यावर बसून होते. तितक्यात कुणीतरी बाजूच्या बँक मध्ये जाण्यासाठी आलेल्या माणसाने त्यांच्या दुकानासमोर गाडी पार्क केली. गोम्या वैतागले
गोम्या: “अरे दुकानासमोर काय गाडी पार्क करता? काही कॉमन सेन्स आहे की नाही? हटवा ती गाडी.”
बँक मध्ये आलेला माणूस तोडीस तोड होता. तोही अशा बोलण्याला वैतागला.
माणूस: “जागा दिसतेय का कुठे? काही पण बोलता.”
गोम्या: “हटवा गाडी नाहीतर बघतोच मी तुम्हाला..”
माणूस: “काय बघता बघू तरी मला. मी नाही हटवणार गाडी.”
असं म्हणत तो रागारागाने गाडीतून उतरला.
तितक्यात सोम्या गोम्यांना भेटायला घाईघाईत येताना दिसले. ते पोचले तेव्हा गाडीवाल्याने त्यांना पाहिलं. आणि त्याने एकदम हात जोडले.
माणूस: “अरे सर तुम्ही! कसे आहात?”
सोम्या: “अरे दिनेश तू… कसा आहेस?”
माणूस: “मी मस्त सर… तुमचीच कृपा आहे.”
सोम्या: “काय भांडण कसलं चाललंय तुमचं माझ्या मित्राबरोबर?”
माणूस: “हे तुमचे मित्र आहेत! अरे गाडी पार्क करायला दुसरी जागा नाही तर हे दादागिरी करताहेत इथे नको लावू म्हणून.”
सोम्या: “अरे यांचं दुकान आडोश्याला जातं. लोकांना दिसलं तर पाहिजे.”
माणूस: “बरं सर तुम्ही सांगता तर लांब गाडी लावतो मी. काही प्रॉब्लेम नाही सर.”
आणि तो माणूस गाडीत बसला आणि बँकेपासून लांब गाडी पार्क करायला गेला.
इथे गोम्या बघतच राहिले. ‘सोम्याच्या एका वाक्याने तो गाडीवाला ऐकला होता. आपलं काही चुकत तर नाही ना!’ सोम्या घाई घाईत आत आले.
सोम्या: “अरे गोम्या तुला काहीतरी मस्त सांगायचंय.”
गोम्या: “आधी माझं ऎक… “
सोम्या: “बरं बोल तू.”
गोम्या: “मी नेहमी बोलत असतो असा प्रतिकार करा, असं भांडा… पण आज आयुष्यात एव्हढ्या उशिरा माझे डोळे उघडले.. तुझ्या एका वाक्याने तो भांडणारा माणूस शांत झाला आणि त्याने गाडी चक्क लांब पार्क केली. तूच बरोबर होतास नेहमी, मी चुकलो.”
सोम्या आधी एकदम शांतच झाले. आणि दोन मिनटं गोम्याकडे बघत राहिले. मग त्यांना जोरजोरात हसायला आलं… इथे गोम्याना कळेना सोम्यांच काय झालं..
सोम्या: “ऐक मी काय सांगतोय ते. अरे तू त्या दिवशी बोललास ना रघुला त्याचा खूप विचार केला मी. माझी पण सून मला खूप बोलते. मला वाटलं मी इतकं सहन करतोय ते माझंच चुकलं. आणि रात्री सुन तावातावाने मला बोलली. आम्हाला पंखा जोरात लागतो तुम्हाला कमी लागतो तर तुम्ही बेडरूममध्ये जाऊन बसा.. मी असा चिडलो. आयुष्यात पहिल्यांदाच इतका चिडलो असेन मी. म्हटलं घर माझं आहे तुम्हाला त्रास होत असेल माझ्या प्रत्येक गोष्टींचा तर व्हा वेगळे. असं बोलल्यावर तिला बरंच झालं. मी तर मनाची तयारी केली होती. कसंतरी राहायचं एकटं. पण माझा छोकरा अस्सल निघाला. म्हणाला तू जायचं तर जा. मी नाही येणार. गप्पच बसली आणि किचनमध्ये निघून गेली.. आता परत बोलताना विचार करेल नीट”
हे ऐकून गोम्या पण दोन मिनिटं गप्पच बसले. सोम्याकडे पाहत राहिले. आणि एकदम दोघांना हसू फुटलं. दोघ जोरजोरात हसायला लागले आणि एकमेकांना टाळ्या देऊ लागले….