नम्रताने, संदीपने भेट दिलेली साडी नेसली. नम्रताची सौंदर्य दृष्टीच चांगली होती. त्यामुळे तिचा ड्रेसिंग सेन्स, मेक अप सगळंच उत्तम असायचं. ती बऱ्याचदा संदीपला विचारायची, “मी मनाने अशीच असते पण दिसायला सुंदर नसते तर तू माझ्यावर प्रेम केलंच नसतं ना?” संदीपने याचं उत्तर कधीच नीट दिलं नव्हतं. तो मस्करीत तिला टाळत असे.
संदीप: “तू काय स्वतःला फार सुंदर समजतेस…”
नम्रता: “फार नाही पण आहेच ना?.. “
संदीप चिडवल्यासारख हसतो..
नम्रता: “देईन फटका.. विद्रूप तर नाहीय ना?”
संदीप: “विद्रुपच आहेस म्हणून मी पसंत केलं…”
नम्रता: “हो हो… आला मोठा!”
नम्रता आणि संदीप नविन झालेल्या लाइट्स अँड साऊंड्स रेस्टॉरंट मध्ये निघाले. गाडीतून जाताना संदीप सतत फोन वर होता. आजकाल असच असायचं…संदीप सतत फोन वर.. भारावल्या सारखा तो यशाच्या मागे लागला होता… नम्रताचं आयुष्य म्हणजे फक्त संदीप आणि तिचे काही छंद… नम्रतासाठी संदीप बरोबरचा क्वालिटी टाइम फार महत्त्वाचा होता. संदीप कॉलेज मध्ये अभ्यासात फार हुशार नव्हता. पण त्याची नाती जपायची आणि जोपासायची गोड सवय नम्रतला भुरळ पाडून गेली होती. नम्रताला आजकाल संदीप कडे बघताना कुणी परकाच माणूस दिसत असे… पण तिला समजत होतं संदीप रमलाय… त्याला कामात स्वतःला झोकून देणं… यशाच्या पायऱ्या चढत जाणं आवडत होतं.
पण आज प्रोमोशन च सेलिब्रेशन फक्त तिच्याबरोबर साजरं करायचं ठरवलं होत त्याने… मग हा वेळ तरी त्याने इतरांना.. कामांना विसरावं असं वाटत होत तिला..
संदीपने फोन ठेवला तोपर्यंत जेवण आलं… आणि संदीप कामाच्या विचारातंच खाऊ लागला.. तितक्यात त्याचं लक्ष नम्राताकडे गेलं… आजकाल कधीतरी त्याला जाणवत होत खरं त्याच्याबरोबर नम्रता कंटाळत असते..
संदीप: “नम्रता… तू इतकी क्रिएटिव्ह आहेस.. कधी काही यातून करिअर उभ करायचा का नाही प्रयत्न करत… म्हणजे मला माहित आहे हॉबीज जपून तू आयुष्य एन्जॉय करते आहेस.. पण करिअर इज करिअर यु नो… आय विल स्पॉन्सर यू… आय मीन रिअली..”
नम्रता: “तू माझा विचार करतो आहेस की स्वतःमुळे निर्माण झालेली कमतरता भरून काढतो आहेस… “
संदीप: “म्हणजे???”
नम्रता: “माझ्या डोळ्यांनी जग बघू शकत नाहीस तू संदीप..”
संदीप: “म्हणजे काय बोलते आहेस? आय एम टॉकिंग सो सिंपल टू यू.. यू आर अननेसेसरीली बिंग कॉम्प्लिकेटेड”
नम्रता पटकन त्याच्या डोळ्यांच्या दोन्ही बाजूला हात ठेवते.. झापड लावतात तसे आणि त्याला विचारते…
“सांग डाव्या बाजूला काय आहे?”
संदीप: “अम्मम… नाही आठवत..”
नम्रता: “आठवत नाही नव्हे… तुला माहीतच नाहीय… बघ…”
आणि ती हाताने त्याचा चेहरा डाव्या बाजूला वळवते..
डाव्या बाजूला एक कितीतरी मोठा ल्यांटर्न ठेवला होता… शोभेसाठी.. आणि त्यात खरोखर आग लावली होती..
संदीप: “वाव… “
नम्रता: “बघीतलस माझ्या नजरेने जग?….”
आणि ती हाताने त्याची हनुवटी पकडते
“सीलिंग ला सांग कोणता रंग आहे?”..
संदीप पुन्हा गप्प.
नम्रता हाताने त्याचा चेहरा वर करते
“तुझा आवडता..आकाशी..”
“बघ सभोवती..मंद प्रकाशात विरघळणारे..मधुर संगिताबरोबर वाहणारे हे अप्रतिम क्षण…मनात श्र्वासांबरोबर भरून घे… किती शांत आणि नितळ आहे सगळ..थोडा मोकळा हो तुझ्या स्वप्नातून… फक्त माझ्यासाठी नाही.. तुझ्यासाठी पण………
मग मी झाशीची राणी बनावी असं नाही वाटणार तुला..” आणि नम्रता मनापासून हसते…
संदीप फोन सायलेंट मोड वर करतो आणि बाजूला ठेवून देतो… खरोखर किती निवांतपणा होता त्या क्षणात.. सौम्य हसणारे..खुश असलेले सगळे चेहरे आजूबाजूला.. मधुर संगीतात मिसळलेले जेवणाचे चविष्ट वास.. छोटुकले रंगीत पतंग लटकत होते छताला.. कसलीच घाई नव्हती.. असलीच स्पर्धा नव्हती…फक्त हा क्षण.. आधी काही नव्हत आणि पुढे काही नाही… संदीपने खुश होऊन स्मित करत नम्रताचा हात हळुवार पकडला
“नम्रता तुला एक सांगू..”
“ह्म..”
“तू एकदम विद्रूप असतीस ना.. काँजुरींग मधल्या भुतासारखी.. तरी मी तुझ्याच प्रेमात पडलो असतो.. आणि तुलाच लग्नासाठी पटवल असत..”
आणि दोघे मनापासून हसतात..