Satirical Marathi Articles

त्यांनी मरताना “हे राम” म्हटलं नसेल म्हणून

कदाचीत ब्रह्मदेव, शंकर हे लोकंच त्रिशूळ, ब्रह्मास्त्र वगैरे घेऊन अवतरले असतील (देव अवतरतात असं यासाठी म्हणत असतील की ते विमान, हेलिकॉप्टर सदृश्य कुठलेही वाहन न घेता त्यांच्या स्वर्गातल्या हिंदू एरियातून अलगत उतरतात किंवा कुठला ना कुठला अवतार घेऊन उतरतात.) आणि त्यांनी नरेंद्र दाभोळकरांवर गोळ्या घातल्या असतील. छे!! काहितरी गल्लत होतेय. त्रिशूळातून गोळ्या कशा सुटतील!पण म्हणून तर कुणी पकडलंच जात नसाव. पृथ्वीवर मिशन कंप्लिट करून डायरेक्ट स्वर्गात फरार होणारे देव मुंबई पोलिसांना कॅमेऱ्यात आणि प्रत्यक्षात दिसणार तरी कसे, हीच सगळ्यात शक्य वाटणारी शक्यता आहे. (मानलत ना माझ्या अचाट बुद्धीमत्तेला) शेवटी हिंदू धर्माचा अल्टिमेट कॉपीराईट, हिंदुत्ववादी राजकीय पक्ष आणि संस्थांनंतर देवांकडेच असणार ना!

पण राव एवढं मोठं अमंगळ वागणं करावंच कशाला कोणी? अरे करायचच असेल तर भ्रष्टाचार करा, बुवाबाजी करून लोकांना आणि बायकांना लुटा, एवढीच खुमखुमी असेल तर आडवळणी एखादा रेप… एवढ्या सगळ्या राजरोसपणे करण्यासारख्या गोष्टी असताना जादूटोणा विरोधी बिल चळवळ आणि लोकांना तर्कशुध्ध विचार करायला सांगण… ये मजाल!

अरे हे बील पास झालं तर समस्त बुआ कम्युनिटी चा एम्प्लॉयमेंट चा प्रश्न कोण सोडवेल? काय करतात हे जादूटोणा वाले बुवा? तर भूत काढण्यासाठी भूत लागलेल्या माणसाला साखळीने किवा दोऱ्याने बांधतात, छताला टांगतात, केस ओढून काढतात, भाजतात, प्रसंगी मलमूत्र प्राशन करायला लावतात. अरे देव आहे तर भूतही असेलच. आणि आपल्याला माहित नाही तर कोणीतरी ते काढू दे की.

जादू आणि चमत्कार बघायची तर लहानांपासून मोठ्यांना आवड आणि ते दैवी असतील तर देवाच्या कामाला पैसे दिलेच पाहिजेत. तसं आपण फार ठरवू आपले पैसे विधायक कार्यास घालायचे म्हणून देशातील समस्या संपणार आहेत काय. अरे!! आजपर्यंत कुठेही कोणत्याही समस्या संपल्यात का. एवढा आशावाद ठेवायला आपण काय सिकंदराच्या कुळातले आहोत काय??

तशीही माणसं मरतातच. बकऱ्याऐवजी प्रसादाला थोडी माणसच कापली तर काय बिघडल? शेवटी हाही जीव आणि तोही जीव. वाढत्या लोक संखेला आळा आणि देवाचा कृपा प्रसाद असे एका दगडात दोन पक्षी मारण्यासाठी सरकारने तर ही मर्त्य बळीची योजना हिरीरीने का काय म्हणतात तशी राबवली पाहिजे. तशाही गावा खेड्यात वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यात कोणाला फारसा उत्साह नाही. मग मंत्र म्हणून त्यांना बरं करण्याची सेवाभावी वृत्ती दाबून कशाला टाका?

माणसांच्या देव दानवाच्या संकल्पना खोट्या तर ठरवता येत नाहीत. तर मग खऱ्याच मानून चेटकी समजून स्त्रियांची नग्नावस्थेत धिंड काढणं आपसूकच आलं. कसेही का होईना पण बुवा लोकांमुळे बायका गर्भवती राहून अपत्य प्राप्तीची सुवर्णसंधी माणसांना मिळतेय ना.१००% नैतिकता, समभाव, बंधुभाव, वैचारिक प्रवृत्ती येणार आहे का जगात? (पुन्हा एकदा सिकंदराच्या कुळातील नसल्याची आठवण)

मग चाललंय तसं चालुदे!!! कोणे एके काळी आटपाट भारत देश होता आणि त्यात बुआगीरीचं साम्राज्य पसरलं होतं अशी कहाणी भावी पिढीला सांगण्यात कोणाला रस आहे? त्यांनी मारताना “हे राम!!” असं जरी म्हटलं असतं तरी त्यांना स्वर्गात स्थान होतं. आता त्यांचा आत्मा समस्त बुआ लोकांच्या मानगुटीवर येउन बसला नाही पुरे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *