वर्ष १९८६ –
ताई ने मिनूला झोपेतून उठवायला हलवलं. मिनू खूप वैतागली… ती ताईला ढकलू लागली. ताई हसत हसत तिला जोरजोरात हलवू लागली. मिनू चीड चीड करू लागली आणि ती डोळे चोळत चोळत उठली तेव्हा ताईने कागद कापून तयार केलेली नक्षी तिच्या डोळ्यासमोर धरली. मिनू आश्चर्यचकीत झाली.
मिनू: “वा… हे कसं बनवलं?”
तिची सगळी झोप उडाली.
ताई: “कोणता कागद आहे ओळख..”
मिनू: “ओह तो मघाशी चित्र काढताना फाटलेला?”
ताई: “बरोब्बर!”
मिनू: “कसं केलंस हे?”
ताई: “तू सांग कसं केलं असेल?”
मिनू: “सांग ना….मला नाही माहीत.”
ताई: “अगं कागदाची हवी तशी घडी करायची आणि मग हवं त्या डिझाईन मध्ये घडी केलेल्या कागदाला कापायचं. मग उघडला की अशी सुंदर डिझाईन मिळते..”
मिनू डोळे विस्फारून त्या पूर्वी अस्तित्व गमावलेल्या पण आता सुंदर सजलेल्या कागदाकडे पाहत राहिली….
वर्ष २०१८ –
आज हसत खेळत सगळ्यांना जेवण वाढणाऱ्या ताईकडे बघताना मिनूला ती सुंदर भासत होती…फार जुनी गोष्ट नव्हती. अशा भयानक गोष्टींना किती दिवस होतात ते कोण मोजतंय… आई होण्याची स्वप्न बघणाऱ्या ताईचं ब्लड प्रेशर वाढलं आणि तिने जुळी बाळं गमावली. खूप वर्षांच्या निरनिराळ्या प्रयत्नांनंतर ती गरोदर राहिली. पण नियती कधी कधी राक्षशीण बनते. ताई नव्हती रडली तेव्हाही ओकसाबोक्शी… आणि आताही ती परिपूर्ण आयुष्य जगत होती…
वर्ष २०१९ –
लग्नाची मिनूला पडली नव्हती. पण कुणी असतं तर मजा आली असती का, हा प्रश्न तिला छेडत राही. कधी कधी इतर दोस्तांचे रोमँटिक, अवखळ किस्से ऐकताना आपल्या आयुष्यात काही कमी आहे का असं तिला उगाचच वाटत राही.
मग अविनाश सारख्या हॅंडसम, मितभाषी, सोज्वळ मुलाचा तिला अचानक होकार आला. आई वडिलांनी बघितलं होत स्थळ. पण ती त्याला भेटली तेव्हा थोडंस असं झालं की सफेद घोड्यावर स्वार होऊन अविनाश तिच्या मनात दौडत आला. तिचं तिलाच हसू आलं…
मग साग्रसंगीत लग्न झालं. एक महिना खूप आनंदात गेला. पण कधी अविनाश तिला कुठेतरी हरवल्यासारखा भासे. पण होता तो अंतर्मुख म्हणून तिच्या लक्षात फार आलं नाही. पण हळू हळू तो वेगळाच झाला. म्हणायला लागला आपल्या घरात कॅमेरा लावलाय आणि लोकं आपल्याला २४ तास बघताहेत. झोपूनच राहू लागला. हळू हळू हे भास वाढायला लागले तेव्हा मिनू त्याला सायकीयाट्रीस्टकडे घेऊन गेली. ती पण थोडी बधीर झाली होती या घटनेमुळे.
डॉक्टरांनी अनुमान केलं स्किझोफ्रेनिया आहे. ती ऐकून होती हा आजार बरा होत नाही. ती मनातून एकदम ढासळली. नको वाटलं सगळं. तिला अविनाशचा खूप राग आला. पण तो बिचारा काय करेल. तिला रडूच आलं… आपले अश्रू लपवत पुसत ती ऑटोतून घरी आली.
तिला काहीच कळत नव्हतं. रात्रीच जेवण बाहेरूनच मागवायचं ठरवलं तिने. तिला झेपणार नव्हतं आज काही. पण मन कशाततरी रामवायला तर पाहिजे…कोणाशी अशी गोष्ट बोलायची की नाही हा पण प्रश्न होता. घरच्यांनी तर खूप टेन्शन घेतलं असतं. तिने कपाट आवरायचं ठरवलं. तिचं मन सैरावैरा झालं होतं पण ती एक एक वस्तू काढत राहिली. तिच्या हातात लहानपणीची डायरी आली. तिने ती डायरी चाळायला सुरुवात केली. एकदम त्या डायरीतून कसलातरी कागद पडला. तिने पाहिलं तर ती वस्तू होती कागदाची कापून बनवलेली नक्षी. तिने ती नक्षी उघडली…आणि तिच्या डोळ्यांसमोर आठवणी उभ्या राहिल्या. ते चित्र काढणं….ते पेन्सिल आत घुसून कागद फाटणं…स्वतःचं बोर होऊन झोपी जाणं… मग ताईने झोपेतून उठवणं… स्वतःचं चीड चीड करणं… मग ताईने त्या वाया गेलेल्या कागदाची सुंदर नक्षी डोळ्यांसमोर धरणं…आणि स्वतःचं खुश होऊन जाणं… तिच्या डोळ्यासमोर बाळं गमावलेल्या सावरलेल्या खंबीर प्रसन्न ताईची मोहक मूर्ती उभी राहिली…ताईने टाकाऊ कागदातून सजवलेली ती सुंदर नक्षी तिला खूप काही सांगत होती… तिने डोळे पुसले… ती निर्धाराचं हसली… तिने कपाट तसंच आवरलं…ती आतल्या खोलीत शून्यात नजर लावून बसलेल्या अविनाशकडे गेली आणि मंद स्मित करत तिने अविनाशला घट्ट मिठी मारली……