मबईत तरी अशी प्रथा आहे की कामवाली बाई कोणत्या ना कोणत्या कामासाठी असतेच. आणि ज्यांच्याकडे नाही ते तिची स्वप्न बघतात. पण कामवाली बाई असणं हे सोप्पं काम नाही राव. नुसतं बाई मिळाली म्हणून खुश होऊन चालत नाही… तिच्याबरोबर जमवून घेताना मालकिणीच्या सहनशक्तीची परीक्षा असते! आणि तिच्या कंपलेंट्स ऐकून घेणं हे मालकाचं रोजचं महत्वाचं काम. चला तर मग कामवालीचे काय काय प्रताप असतात ते जाणून घेऊ…
प्रताप १ – या कानांन ऐकून त्या कानांन सोडणे:
या प्रताप करणाऱ्या कामवाल्या बाया मालकिणीचं एक म्हणूंन ऐकत नाहीत. त्यांना किती वेळा जरी सांगितलं चमचे टबमध्ये नको टाकू ते खाली जातात आणि मिळत नाहीत, तरी त्या पुन्हा पुन्हा चमचे तिथेच टाकतात. त्यांना कितीही सांगितलं की ही भांडी अशी अशी इथे ठेव, तरी त्या नको त्या जागी भांडी ठेवतात. अशा चूका करतात की आपल्याला त्यांच्या बुद्धधीमत्तेवर शंका यावी. पण त्या काही सुधारत नाहीत आणि आपल्या शंकांचं निरसन काही होत नाही.
प्रताप २ – न केल्यानं चालते रे:
या प्रताप करणाऱ्या बाया फार मितभाषी आणि “मितकामी” असतात. त्यांना भांडी घासायचे पैसे मिळतात ना मग त्या फक्त भांडीच घासतात. ती भांडी ज्यात घासली जातात ते सिंक धुणे हे आपलं काम आहे असं त्यांना वाटतंच नाही. त्यामुळे हा सगळा बोजा मालकिणीच्या खांद्यावर असतो. पटापट सांगितलेलं काम उरकून कुठे पळायची घाई असते यांना कोण जाणे.
प्रताप ३ – मी ही अशीच आहे:
या प्रताप करणाऱ्या बाया सुद्धा अर्धवट काम करण्यात तरबेज असतात. लादी पुसतील तर सगळं पाणी तसंच ठेवतील. माझ्या शेजारच्यांकडे अशीच बाई होती. ती गेल्यावर मी मालकिणीला म्हटलं, “अरे इथे सगळं पाणी तसंच आहे.” तर मालकीण म्हणाली “अगं तशीच पुसते ती.” म्हणजे कामवालीच्या ‘मी ही अशीच आहे.’ attitude शी मालकिणीने जुळवून घेतलं होतं.
प्रताप ४ – डोळे झाकून दूध पिणे:
या प्रताप करणाऱ्या बाया घरात चक्क चोरी करत असतात. कुठे थोडीशी हळद, थोडा मसाला असं चोरून नेत असतात. पण मांजरीने डोळे झाकले म्हणून ती दूध पिते हे कळायचं राहणार आहे का. माझ्या मैत्रिणीची बाई अशी निघाली. मग काय मैत्रीण हळहळून सांगायला लागली, “सहा महिने मेहनत करून तिला सगळं आमच्या पद्धतीचं जेवण शिकवलं होतं. आता तिला काढलं.. सगळी मेहनत फुकट गेली.” पण आता काय करणार. हा प्रताप करणाऱ्या बाया सुधरत नाहीत.
प्रताप ५ – मागितल्याने मिळतं
हा प्रताप करणाऱ्या बाया सारखं काही ना काही मागत राहतात. या काम अगदी नीटनेटकं, व्यवस्थित करतात. त्यांना त्याच्या बदल्यात फार अपेक्षा असतात. हल्लीच माझ्या बाईने मला मास्क आणून दे असं हक्काने सांगितलं. दिवाळीला त्या हक्काने साडी मागतात. पण इतर वेळीही त्या काही ना काही मागत राहतात.
मी करेन तो कायदा
हे प्रताप करणाऱ्या बाया कधीही अचानक सुट्टी मारू शकतात. त्या खूपदा लेट येतात आणि आपला खोळंबा करतात. यांच्यावर अवलंबून राहणं म्हणजे मालकिणीला तारेवरची कसरत असते.
असे अनेक प्रताप आपल्या बाया करत असतात. पण आपण जातो कुठे. ज्याच्या नशिबात जी बाई असते तिच्याबरोबर आपल्याला जुळवून घ्यावच लागतं. कारण कामवाली बाईने होत आहे रे, आधी बाई ठेवलीची पाहिजे.