Satirical Marathi Articles

झुरळ आणि मी..

आपण सगळे एकाच युनिव्हर्सल एनर्जीचा भाग आहोत आणि म्हणून आपण सगळे जोडलेले आहोत असं म्हटल जात. मलाही हे खर असावं अस वाटत. पण याला मोठा तडा जातो जेव्हा मी कोपऱ्यातून मिषा वळवळवत स्फूर्तीने आपल्याच दिशेने धावत येणाऱ्या झुरळाला बघते.
मी समजू शकते त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. पण असंबद्ध पणे धावून दुसऱ्यांना घाबरवण हे भगवे कपडे घालून अश्लील नृत्य करण्याइतकंच निषिद्ध आहे. माझ्या एका ओळखीच्या मुलाच्या चड्डीत एकदा झुरळ शिरल होत. अर्थात तो लहान असताना. झुरळाने काय आक्रमक विचार करून हे असं केलं की ते इतकं अविचारी आहे हे कोड मला आजतागायत सुटलेलं नाही. मिशा विस्फारून जणू काही आपल्याकडेच पाहतंय अस वाटणार झुरळ आतंकवादी वृत्तीने पिसाटलेल आहे की त्याच्यावर झाडू मारण्याचा प्रयत्न फसला की पुन्हा आपल्याच दिशेने येणारं ते मूर्खपणाचं साक्षात रूप आहे काहीच कळत नाही. सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असत अस म्हणतात. झुरळाकडे पाहताना माझे डोळे साफ फुटलेलेच असावेत असं वाटत मला. काहीही असो..अस म्हणतात पृथ्वीच्या अंतापर्यंत बदलत्या वातावरणाशी जुळवून घेत टिकून राहणाऱ्या प्राण्यांमध्ये झुरळ हे अग्रणी आहे…
त्यामुळेच मी त्याच्यापुढे नम्र होते आणि माझ्या शुल्लक तात्पुरत्या अस्तित्वासाठी त्याचा अंत न करण्याचं ठरवते… पण मला माहित आहे. मी भले ठरविन… पण त्याने नक्कीच ठरवलेलं असणार..माझ्या अंतापर्यंत मिस्टर इंडियासारख माझ्या आजूबाजूला अचानक प्रकट होऊन माझी धावपळ पाहण्याची मजा ते काही सोडणार नाही!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *